5 Years FD Interest Rates : भारतीय रिझर्व्ह बँकेने या वर्षात रेपो रेटमध्ये मोठी कपात (१.००%) केल्यानंतर देशातील सर्व प्रमुख बँकांनी मुदत ठेवींवरील व्याजदरात घट केली आहे. तरीही, आजही अनेक गुंतवणूकदारांसाठी एफडी हा गुंतवणुकीचा एक सुरक्षित आणि आकर्षक पर्याय आहे. त्यामुळे मुदत ठेवींवर सर्वाधिक व्याजदर कोण देतोय? याचा शोध गुंतवणूकदार घेत असतात. आज आम्ही तुमच्यासाठी असेच काही पर्याय घेऊन आलो आहोत.
पोस्ट ऑफिस
पोस्ट ऑफिसमध्ये ५ वर्षांच्या मुदत ठेवीला टाईम डिपॉझिट म्हटले जाते. पोस्ट ऑफिस आपल्या सर्व वयोगटातील ग्राहकांना ५ वर्षांच्या एफडीवर सर्वाधिक ७.५% इतके व्याज देत आहे. पोस्ट ऑफिसमध्ये सर्व वयोगटासाठी एकसमान व्याजदर लागू होतो. सध्या देशातील कोणतीही मोठी बँक ५ वर्षांच्या एफडीवर सामान्य ग्राहकांना ७.५% व्याज देत नाही.
प्रमुख बँकांचे ५ वर्षांचे एफडी दर (सरासरी)
| बँक | सामान्य ग्राहक (व्याजदर) | ज्येष्ठ नागरिक (व्याजदर) |
| पोस्ट ऑफिस (टाईम डिपॉझिट) | ७.५०% | ७.५०% |
| एसबीआय | ६.०५% | ७.०५% |
| एचडीएफसी बँक | ६.४०% | ६.९०% |
| पीएनबी | ६.२५% | ६.७५% ते ७.०५% |
प्रमुख बँकांचे तपशील
भारतीय स्टेट बँक
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआय, ५ वर्षांच्या एफडीवर सामान्य ग्राहकांना ६.०५% आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.०५% इतके व्याज देत आहे.
एचडीएफसी बँक
मार्केट कॅपिटलायझेशननुसार देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँककडून सामान्य ग्राहकांना ६.४०% आणि ज्येष्ठ नागरिकांना ६.९०% पर्यंत व्याज दिले जात आहे.
पंजाब नॅशनल बँक
या पब्लिक सेक्टर बँकेकडून सामान्य ग्राहकांना ५ वर्षांच्या एफडीवर ६.२५% व्याज मिळत आहे. तर, ज्येष्ठ नागरिकांना ६.७५% आणि ८० वर्षांवरील अति-ज्येष्ठ नागरिकांना ७.०५% पर्यंत व्याज दिले जात आहे.
वाचा - कोचीन शिपयार्डपासून ते एचयूडीसीओपर्यंत; पुढच्या आठवड्यात कोणती कंपनी किती लाभांश देणार?
कमी जोखीम आणि स्थिर परतावा शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी, सध्या पोस्ट ऑफिसची ५ वर्षांची टाइम डिपॉझिट योजना आकर्षक ठरत आहे, कारण इथे कोणत्याही वयोगटासाठी ७.५% चा उच्च व्याजदर उपलब्ध आहे.
